नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी (Onion Product Boycott) हटवली अशा बातम्या आल्या होत्या. त्यावर आता केंद्राने स्पष्टीकरण दिलं असून कांदा निर्यातबंदी हटवली नसून 31 मार्चपर्यंत ती कायम असेल असे सांगितलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे ते चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून येतंय.

onion export

केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने येत्या 31 मार्चपर्यंत कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहील असा निर्णय जाहीर केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना निर्यातबंदीच्या खेळावरून झळ सोसावी लागेल, असं म्हणत शेतकरी संघटनांनी जाहीर निषेध केला आहे.
निर्यातबंदी उठवली म्हणून केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी गाजावाजा करत विविध माध्यमातून जाहीर केले होते. मात्र केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने लगेचच पुन्हा 31 मार्चपर्यंत निर्यातबंदी लागू राहील असे जाहीर केल्याने शेतकरी संघटना संतप्त झाल्या आहेत.

कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्याला प्राधान्य

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी पीटीआयला सांगितले की, “कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आलेली नाही. सध्याच्या परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती ग्राहकांना वाजवी दरात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करणे हे सरकारचे सर्वात मोठे प्राधान्य आहे. त्यामुळे 31 मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी कायम राहील. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. 8 डिसेंबर 2023 रोजी सरकारने 31 मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

होलसेल मार्केटमध्ये कांद्याचे भाव 40 टक्क्यांनी वाढले

कांदा निर्यातीवरील बंदी उठवल्याची बातमी समोर येताच, देशातील सर्वात मोठी घाऊक कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथे घाऊक कांद्याचे भाव 40 टक्क्यांनी वाढून 1800 रुपये प्रति क्विंटल झाले.

भारत कांद्याचा जगातील दुसरा मोठा निर्यातदार

भारतातून जगभरात कांद्याची निर्यात केली जाते. भारत जगातील  दुसऱ्या क्रमांकाचा कांदा निर्यात करणारा देश आहे. कांदा जवळजवळ प्रत्येक देशात लोकांच्या स्वयंपाकघरात वापरला जातो. यासोबतच कांद्याच्या दरातील चढ-उताराचा थेट परिणाम महागाईच्या आकडेवारीवर आणि सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे.

जगातील अनेक देश कांद्याच्या पुरवठ्यासाठी पूर्णपणे भारतावर अवलंबून आहेत. यामध्ये बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मॉरिशस आणि बहरीन या शेजारील देशांचाही समावेश आहे. यासोबतच भारतीय शेतकरी इतर अनेक देशांमध्ये कांद्याची निर्यात करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *