उपलब्ध शेतजमिनीतून उत्पादन वाढविण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येला पोसण्याची व त्यांच्या दुय्यम गरजा भागविण्याची उपयोगिता नॅनो तंत्रज्ञानामध्ये आहे. भविष्यातील गरजा व आवश्‍यकता लक्षात घेऊन संशोधनामध्ये नॅनो तंत्रज्ञानाला अत्यंत महत्व आहे.

नॅनो तंत्रज्ञानाचा शोध टोकियो विद्यापीठातील शास्त्रज्ञ नोरिओ टॅनीगुची यांनी लावला. नॅनो या शब्दाचा ग्रीक भाषेतील अर्थ आहे “खुजा’ किंवा “बुटका’. गणिती शब्दात सांगायचे झाले तर 10-9 म्हणजे नॅनो. जिवाणू या सूक्ष्मजीवांचा आकार 1000 ते 10.000 पा आहे. विषाणूंचा आकार 100 पा आहे तर अणूचा आकार 0.1 पा आहे. यावरून आपल्याला 10-9 म्हणजे नॅनोचा सूक्ष्मपणा लक्षात येईल. नॅनो तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रातील संशोधनामध्ये कशाप्रकारे केला जाऊ शकतो, यावर जगातील अनेक शास्त्रज्ञांचे संशोधन चालू आहे.

हवामान, जमीन या घटकांबरोबरच पिकांवर पडणाऱ्या किडी आणि रोग यामुळे पिकांचे गुणात्मक आणि संख्यात्मक नुकसान होते. शास्त्रज्ञांच्या मते नॅनो तंत्रज्ञानाचा वापर तत्काळ रोगनिदान करण्यासाठी होऊ शकतो. त्याचप्रमाणे रोगांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी येत्या काळात नॅनो तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा ठरणार आहे.
भविष्यामध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली नॅनो यंत्रे अथवा नॅनो उपकरणे यांच्या माध्यमातून वनस्पतींची शाकीय वृद्धी, सुदृढता; तसेच वनस्पतींची विविध अंगांनी होणारी वाढ दिसून येण्यापूर्वीच माहिती करून घेता येईल. अशाप्रकारची “स्मार्ट उपकरणे’ तत्काळ सूचना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी उपयोगी पडतील.

नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून रोगनाशकांच्या नॅनो कणांपासून रोगनाशके तयार केली तर निश्‍चितच कमी प्रमाणात वापरावी लागतील आणि रोगांचा तत्काळ प्रतिबंध करता येणे शक्‍य होईल. रासायनिक खतांमध्येसुद्धा नॅनो कणांचा वापर करून नॅनो खते तयार केल्यास खतांची मात्रा कमी प्रमाणात द्यावी लागेल. नॅनो तंत्रज्ञानामुळे रोगनाशके, कीडनाशके, खते यांवर होणारा खर्च तर कमी होईलच, त्याच्याबरोबर रासायनिक पदार्थांचे उर्वरित अवशेष जे मानवी आरोग्यास, तसेच जमिनीच्या सुपीकतेला अपायकारक असतात, त्याचे प्रमाणही कमी होईल

कापड उद्योगामध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा वापर

धातुशास्त्र, पदार्थविज्ञान व रसायनशास्त्रामधील नॅनो तंत्रज्ञान संशोधनामुळे असे लक्षात आले आहे, की कापसाच्या सूतगिरण्यांमध्ये व कापड उद्योगांमध्ये हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आहे. कापसाची शेतातून काढणीने कापड तयार होईपर्यंत कमीत कमी 25 टक्के कापसाचे तंतू वाया जातात.

“कॉर्नेल’ या विद्यापीठातील मार्गारेट फ्रे या तंतुशास्त्रातील प्राध्यापिकेने “इलेक्‍ट्रोस्पिनिंग’ या तंत्रज्ञानाचा शोध लावला, ज्यामुळे वाया जाणाऱ्या कापसाच्या तंतूचा उपयोग कमी दर्जाची उत्पादने म्हणजेच चेंडू, दोरे तयार करण्यासाठी केला जाऊ लागला. या तंत्रज्ञानामुळे सेल्युलोजपासून नॅनो तंतू तयार केले आहेत. ज्यांचा व्यास 100 पा म्हणजे कापसाच्या तंतूपेक्षा 1000 पटीने लहान आहे. इलेक्‍ट्रोस्पिनिंगद्वारे तयार केलेल्या सेल्युलोजचा वापर हवा गाळणे, सुरक्षा कपडे तयार करणे, जैवविघटनक्षम नॅनो पदार्थ तयार करणे यासाठी होतो.

पाणी स्वच्छतेसाठी तंत्रज्ञान

काही जीवनसत्त्वे पाण्यात विरघळू शकत नाहीत. नॅनो तंत्रज्ञानाच्या साह्याने नॅनो जीवनसत्त्वे तयार केली आहेत. जी पाण्यात विरघळू शकतात आणि मानवी शरीरासाठी ती उपलब्ध होऊ शकतात.
नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून ऍल्युमिनिअम ऑक्‍साईडच्या 2 पा नॅनो फायबरचा वापर पाणी शुद्धीकरणासाठी केला जातो. या तंतूपासून तयार केलेला फिल्टर पंप जिवाणू, विषाणू; तसेच इतर सूक्ष्म व आदी जीव पाण्यातून वेगळे करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *