कृषी क्षेत्रात नियंत्रित शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्पादन ते ग्राहक या पीक मूल्यसाखळीमध्ये सर्वांत महत्त्वाचे बदल होणार असतील तर नियंत्रित शेतीचे वाढणारे प्रमाण वाढणार आहे. या शेती पद्धतीत विविध प्रकार आहेत. त्यामागील तंत्रज्ञान समजावून घेणे गरजेचे राहणार आहे. या शेतीत शेडनेट, ग्रीन हाऊस, पॉली हाउस, काचगृहातील शेती, व्हर्टिकल फार्मिंग (मजल्याची शेती), डीप फार्म ‌(भूमिगत व्हर्टिकल फार्मिंग), हायड्रोपॉनिक (मातीविना पाण्यावरील शेती) किंवा एरोपोनिक (हवेतील शेती) अशा विविध पद्धतींचा समावेश यामध्ये होतो. नियंत्रित शेतीच्या अनुषंगाने साधने, तंत्रज्ञान, कुशल व्यवस्थापन करणारे कामगार यांची गरज भासणार आहे. पिकांसाठी लागणारे सुयोग्य हवामान अथवा वातावरण याचीही माहिती असणे आवश्यक असेल. वर्षभर वेगवेगळ्या हंगामात पिकांना हवे तसे वातावरण मिळू शकत नाही. यामुळे नियंत्रित शेती पद्धतींपैकी योग्य पद्धतीची निवड करून तसे वातावरण तयार करता येऊ शकते. त्यातून पीक उत्पादन व गुणवत्तेत भरीव वाढ करता येते. ग्रीनहाऊस इफेक्ट या संकल्पनेचा उपयोग थंड हवेच्या देशात हरितगृहामधील तापमान वाढविण्यासाठी करण्यात आला. मात्र आपल्याकडे तापमान कमी करणे तसेच वातावरणातील अन्य घटकांचे नियंत्रण करण्यासाठी हरितगृह व शेडनेटगृहाचा वापर करणे शक्य झाले आहे. हरितगृहामध्ये वातावरणातील तापमान, आर्द्रता, प्रकाश आदी घटकांचा वापर गरजेनुसार केला जातो. कार्बन डाय ऑक्साइड वायूचे प्रमाणही राखता येते. शेडनेटगृहात मुख्यतः वातावरणातील तापमान कमी केले जाते. आर्द्रता, वारा यांचेही नियंत्रण करता येते. बऱ्याचवेळेला शेतकऱ्यांना हरितगृह किंवा पॉलीहाऊस यांपैकी काय करावे असा प्रश्न पडतो. सर्वप्रथम दोन्हींमधील फरक समजून घ्यावा लागेल.

शेडनेट हाउस हे पावसाळ्यात पिकांना पावसापासून संरक्षण देऊ शकत नसल्याने यामध्ये आठ महिनेच शेती करता येते. दुष्काळी परिस्थितीत किंवा अतिशय कमी पावसाच्या ठिकाणी बारा महिने यामध्ये किफायती शेती करू शकतो. शेडनेटहाऊसमध्ये पॉलीहाऊसच्या तुलनेत एक तृतीयांश पर्यंत कमी खर्च येतो. वरील बाबी लक्षात घेतल्यावर आर्थिक निकष पाहूनच निर्णय घ्यावा. कोणते पीक घेत आहोत व त्याला बाजारभाव किती मिळणार आहे, नफा खर्चाच्या तुलनेत किती आहे हा विचार देखील महत्त्वाचा आहे. नियंत्रित शेतीची संधी कोरोना काळात आणि कोरोनानंतरच्या काळात तर शेतकरी युरोप किंवा अमेरिकेमध्ये केल्या जाणाऱ्या शेती पद्धतीचा विचार करू लागला आहे. किंबहुना काही शेतकऱ्यांनी पुणे, मुंबई, नाशिक शहरालगत अशा काही शेतीचा प्रयत्न सुरू केला आहे. नैसर्गिकरीत्या हायड्रोपोनिक शेती किंवा भाजीपाला पिकवण्याचा विचार आपल्यासाठी फार नवा नाही. ईशान्य भारतामध्ये किंवा पश्चिम बंगालच्या समुद्र तटालगत शेतकरी अनेक वर्षांपासून अशा पद्धतीचा कुटुंबाच्या गरजेइतका भाजीपाला अनेक वर्षापासून पिकवीत आहेत. सन २०१२ च्या तीव्र दुष्काळामध्ये कोकणात आणि महाराष्ट्रात अन्यत्र हायड्रोपोनिक पद्धतीने जनावरांसाठी चारा उत्पादन घेण्यात आले आहे. संरक्षित शेतीमध्ये सर्वांत कमी खर्चात आपण शेताच्या चारही बाजूने कीटक प्रतिरोधक जाळी (Insect Net) व अतिनील किरण रोधक फिल्म अर्थात UV Film Geomembrane Fabric चे पडदे लावून चांगला लाभ मिळवू शकतो. यामुळे किडी-रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यात किंवा कमी करण्यास मदत मिळते. जोरदार वाऱ्यांपासूनही चांगले संरक्षण मिळते. याचबरोबर रात्रीचे कार्बन डायऑक्साइडचे वाढलेले प्रमाण रोखण्यासाठी देखील त्याचा फायदा मिळू शकतो. नियंत्रित अथवा संरक्षित वातावरणातील शेतीचे फायदे

पिकाच्या आवश्यकतेप्रमाणे वातावरण निर्मिती केल्यामुळे हरितगृह वा शेडनेटगृहाचे अनेक फायदे
खालीलप्रमाणे आहेत.
पीकवाढीसाठी आवश्यक असणारी वातावरण निर्मिती करता येऊ शकते.
पीक उत्पादन व गुणवत्ता यांच्यात लक्षणीय सुधारणा होते. चांगल्या गुणवत्तेमुळे बाजारभाव
चांगला मिळतो.
बाजारपेठेतील मागणीप्रमाणे योग्य नियोजन करून वर्षभर फळभाजी व फुले यांचा पुरवठा करता येऊ शकतो.
निविष्ठांच्या वापरावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे कमीतकमी निविष्ठांचा वापर करता येतो.
पाणीवापरामध्ये लक्षणीय (९० टक्क्यापर्यंत) बचत होते.
किडी- रोगांच्या प्रादुर्भावास अटकाव होतो.
उच्च दर्जाची फळे व भाजीपाला याबरोबरच वजन, रंग व स्वाद वाढल्यामुळे बाजारामध्ये वाढीव दर मिळतो.
पिकाचे अतिशय कमी तापमान, वारा, गारठा, बर्फ, पक्षी व कीटक यांच्यापासून संरक्षण होते.
पिकाचा पावसाळ्यात गारांपासून तसेच अतिवृष्टीपासून बचाव होण्यास मदत होते.
कमी पाणी व कमी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पन्न मिळण्याची संधी प्राप्त होते.
रोजगार निर्मितीस मोठ्या प्रमाणावर मदत होते.


लेखक – डॉ. प्रल्हाद जायभाये,

कृषी हवामान शास्त्रज्ञ व प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, जालना,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *